घनदाट जंगलात अजूनही एकाकी उभा आहे हा अष्टकोनी वाडा, २०० एकर जमीनदारी असलेला गडचिरोली पोटेगावं येथील हा परिवार एका रात्रीत झाला होता कंगाल…
आपण अनेक ऐतिहासिक किल्ले, महाल, हवेल्या, वाड्यांना इतिहासाच्या पुस्तकांतून वाचत आलेलो आहोत किंवा प्रत्यक्ष बघत आलोय. असाच एक प्राचीन वाडा गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट अरण्यात असलेल्या पोटेगावं येथे असून चक्क अष्टकोनी बांधकाम असलेला हा वाडा आजही जुन्या आठवणी जागवत ताठ उभा आहे.
चंद्रपूर, नागपूरसह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा मध्य भारतातील बऱ्याचशा भागांवर तब्बल पाचशे ते सातशे वर्षे राज्य करणाऱ्या गोंडराजांच्या राजवटीचा फारसा उल्लेख होत नाही. विशेषत: चंद्रपूरच्या गोंडराजांच्या राजवटीत निर्माण झालेल्या जमीनदाऱ्यांमध्ये झालेल्या बांधकामांचा उल्लेखही फारसा होत नाही. भीम बल्लाळसिंग यांनी शिरपूर येथून बल्लारशा येथे गादी आणल्यावर पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी येथून चंद्रपूरच्या राज्याचा कारभार पाहिला.तेव्हा चंद्रपूर राज्यात गडचिरोली जिल्हा समाविष्ट होता. पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी बल्लारपूरहून चंद्रपूर येथे गादी स्थानांतरित करण्यासाठी झरपट नदीच्या काठावर नव्या किल्ल्याच्या परकोटाचा पाया रचला. पण, हा किल्ला त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. पुढे त्यांचे पुत्र हिरशहा यांच्या काळात बांधकाम पूर्ण होऊन बल्लारशाची राजधानी चंद्रपूरला स्थानांतरीत झाली.
याच राजा हिरशहाच्या काळात चंद्रपूर राज्यात एकूण १७ जमीनदाऱ्या निर्माण झाल्या. यापैकी पोटेगावची जमीनदारी सुरपाम परिवाराला मिळाली.अनेक वर्षे गोंडराजांचे जमीनदार असलेले येथील सुरपाम या परिसरात राजे म्हणूनच ओळखले जात. याच परिवारातील श्रीमंत महाराज बारीकरावबापू लालबाबा सुरपाम पोटेगाव येथून आपल्या जमीनदारीचा कारभार बघायचे. येथे सर्वत्र त्यांचा प्रचंड दबदबा असायचा. जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर कर्मचारीसुद्धा त्यांच्या भेटीला पोटेगाव येथे यायचे. पुढे आपल्या परिवारासाठी एक भव्य वाडा बांधावा, असा विचार करून १९४२ मध्ये त्यांनी हा अष्टकोनी चिरेबंदी वाडा बांधायला घेतला. वाड्याचा अष्टकोनी भक्कम चौथरा, पुढे बाकदार कमानीचे प्रवेशद्वार, लाकडी कलाकुसरीचे दरवाजे, महिरपी खिडक्या, मागच्या भागातून वर जाणारे दोन नक्षीदार जिने, वरच्या भागातील सजावटीचा सज्जा, अष्टकोनी आकाराचे बलदंड स्तंभ, अशा पद्धतीने हा वाडा चहूबाजूने आकार घेत असताना बारिकरावबापू सुरपाम यांच्या या वाड्याची ख्याती आणि त्यांच्या श्रीमंतीची महती सर्वदूर पसरू लागली. इथेच घात झाला.
या वाड्याच्या बांधकामावर असलेले मजूर व काही लोकांची वक्रदृष्टी त्यांच्या खजिन्यावर पडली. एका रात्री त्यांच्या घरी दरोडा पडला आणि होते नव्हते सारे चोरट्यांनी लंपास केले. श्रीमंतीत जगणारा सुरपाम परिवार अगदीच गरीब झाला आणि हा वाडा तसाच अर्धवट राहिला. आपल्या अर्धवट स्वप्नाकडे बघत बारीकरावबापू सुरपाम यांनीही देह त्यागला. आता या वाड्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने तो दुरवस्थेत आहे. येथील नगाराही फुटला आहे. पुरातत्त्व विभागाने या प्राचीन वास्तूकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
रावाचे झाले रंक…
तब्बल २०० एकर जमीनदारी असलेला सुरपाम परिवार येथे राजा, महाराजांसारखेच जीवन जगत होता. पण, त्या दरोड्यानंतर सारेच बदलले. वाडा अर्धवटच राहिला आणि या परिवाराचे वंशज रावाचे रंक झाले. बारीकरावबापू यांना खुशालराव, नेपाळराव आणि देवराव अशी तीन मुले व तीन मुली होत्या. आता खुशालराव यांचे चिरंजीव महेश, रवीचंद्र व नरेश सुरपाम, नेपाळराव यांचे चिरंजीव दिलीप व सचिन, देवराव यांचे पुत्र अभिमन्यू हयात आहेत. मात्र, देवराव यांचे पुत्र माणिकराव यांचा मृत्यू झाला. पण, माणिकराव यांचे पुत्र दिनेश सुरपाम हयात आहेत. बारीकराव सुरपाम यांची ही नातवंडे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. यातील महेश खुशालराव सुरपाम याच गावातील वनविभागात वनमजूर म्हणून काम करतात.