आजकाल लग्नं अधिक काळ का टिकत नाहीत..?? आपली विवाह संस्था खरोखरंच कमजोर झालीय का..??

21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणंच अवघड होऊन बसलं आसहे केवळ… तेच नाहीतर टिकणंही अवघड झाले आहे. त्याची काही मुख्य कारणे आहेत….

बदलती मानसिकता : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.

सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.

पालकांचा हस्तक्षेप : मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.

अहंकार : पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.

इतर कारणे : एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.

उपाययोजना:

कुटुंब टिकण्यासाठी : “मेड फॉर इच अदर’ या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु “मोल्ड फॉर इच अदर’ करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.

मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

स्पर्धा टाळावी : पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. “तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.

स्वीकार महत्त्वाचा : अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी : मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

जबाबदारीची जाणीव : लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.

तडजोडीची तयारी : कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.

थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.

Leave a Comment