माशी पुढचे पाय एकमेकांवर का घासते..??

कोणत्याही अन्नपदार्थांवर माशी बसली तर तो अन्नपदार्थ अस्वच्छ आहे हे मानले जाते. त्यात माशी पडली की आपण तो पदार्थ फेकून देतो. ती माशी नेमकं करते काय? तुम्ही हेही पाहिले असेल जेव्हा माशी एखाद्या पृष्ठभागावर बसते तेव्हा ती स्वतःचे पुढचे पाय एकमेकांवर घासते. तर ती पाय का घासते? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग आज आपल्याला हेच जाणून घ्यायचंय.

माशीला तिच्या सभोवतालच्या जगाची जाणीव होण्यासाठी त्यांच्या डोळ्यावर, अँटेनावर आणि त्यांच्या शरीरावर आणि पायांवर असलेल्या ब्रिस्टल्सवर म्हणजे बारीक केसांवर अवलंबून रहावे लागते. डोळे हे आजूबाजूला बघण्यासाठी तर ब्रिस्टल्स हे अन्नपदार्थ गोड म्हणजे खाण्यायोग्य अन्न आहे का किंवा कडू चव किंवा विषारी तर नाही ना हे ओळखण्यासाठी महत्वाची मदत करतात. म्हणूनच योग्य अन्न शोधण्यासाठी आणि तसेच इतर भक्षकांपासून वाचण्यासाठी त्यांना या ज्ञानेंद्रियांना स्वच्छ ठेवावे लागते.

म्हणूनच माशी स्वत: ला स्वच्छ करण्यासाठी त्यांचे पाय एकमेकांवर घासतात. त्यांच्या शरीरावर जे छोटे केस असतात त्यात एक प्रकारचा चिकट द्रव असतो. या चिकट द्रव्यामुळे अनेक छोटे जिवाणू किंवा विषाणू पायाला चिटकून राहतात आणि हेच दूर करण्यासाठी माशी आपले पाय एकमेकांवर घासते. हेच विषाणू मग अन्नपदार्थांमध्ये मिसळून रोगराई पसरवण्यास मदत करतात. आता तुम्हाला माशी अन्नपदार्थ कसे खराब करते याचंही उत्तर सापडलं असेलच.

फक्त पायच नाही तर ते आपले डोके व पंख हेही साफ करत असतात. थोडक्यात माशी स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे काम करत असते. स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवण्यासाठी जसे आपण अंघोळ करतो अगदी तसेच.

“तुपात पडली माशी आणि चांदोमामा राहिला उपाशी” या ओळींचा शास्त्रीय अर्थ यातून समजतो. नाही का?

लेखिका: शीतल दरंदळे

Leave a Comment