मेथी घरोघरी खाल्ली जाणारी सगळ्यांची आवडती एक उत्तम अशी भाजी आहे . हे जणू निसर्गाने दिलेले एक औषधच आहे. मेथीची भाजी मुगाच्या डाळीत किंवा कांद्यात लसूण घालून बनवली जाते . त्याशिवाय मेथीचे ठेपले ,पराठे आणि मेथीचे लाडू देखील खूपच रुचकर लागतात . मेथीचे दाणे आमटीत आणि भाजीत फोडणीसाठी देखील वापरले जातात . मेथी जितकी खायला रुचकर वाटते तितकी ती तब्येतीसाठी पौष्टिक हीआहे . मेथीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम ,आयर्न ,कॉपर ,मॅग्नीज, मॅग्नेशियम ,फॉस्फरस ,विटामीन A ,विटामीन B ,विटामीन K भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती आपल्या तब्येतीसाठी फारच गुणकारी ठरते .
मेथी वात-पित्त -कफ या तिन्ही दोष विकारांवर खूप गुणकारी ठरते . मेथी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे थंडीत आपण मेथीचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे . मेथी वात विकारावर अत्यंत गुणकारी समजली जाते . मेथी नियमित खाल्याने आर्थरायटिस सारख्या आजारांमध्येही आराम मिळतो. जर आमवात ,संधिवात ,कंबर दुखणे ,कोहळा येणे ,चमका येणे असे त्रास होत असतील तर नियमित मेथी चा समावेश आपल्या आहारात केल्याने त्रास कमी होतो . थंडीत विशेष करून आपण मेथीचे लाडू खाल्ले पाहिजे . जर रोज सकाळी आपण मेथीचा १-१ लाडू खाल्ला तर आठवड्याच्या आत वाताने जखडले अंग मोकळं होतं आणि चमका येणेही बंद होतं .
मेथी पित्तनाशक आहे त्यामुळे पित्ताचे बरेचसे विकार कंट्रोलमध्ये येतात. मेथी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते . मेथी खाल्ल्याने ऍसिडिटी गॅसेस, कॉन्स्टिपेशन ,जुलाब ,मुळव्याध असे अनेक विकार बरे होतात . सारख तोंड येत असेल म्हणजेच माउथ अल्सर चा त्रास होत असेल तर मेथी घालून उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो आणि हे पाणी किंवा काढा प्यायल्याने स्टमक अल्सर म्हणजे पोटातला अल्सर ही बरा होतो . जर कॉन्स्टिपेशन चा त्रास होत असेल तर मेथीच्या दाण्यांचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ पाण्यात घालून घ्यावे . गरम पाण्यातुन किंवा गुळातून मेथी घेतल्याने कॉन्स्टिपेशन आणि मूळव्याध या दोघांमध्ये आराम मिळतो . मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी जर आपण खाल्ली तरीसुद्धा कॉन्स्टिपेशन आणि मुळव्याधी बरी होण्यास मदत होते .
मेथी कफनाशक आहे त्यामुळे कफामुळे जे त्रास होतात त्यात सुद्धा मेथी आपल्याला खूप उपयुक्त ठरते . मेथीत वायरल प्रॉपर्टी आहेत त्यामुळे श्वसनमार्गातील इन्फेक्शन काढून टाकण्यासाठी मेथी मदत करते. ब्रोंकाइटिस ,निमोनिया ,सायनसायटिस ,सर्दी ,सारख्या शिंका येणे असे आजार लवकर बरे होतात . रोज चार कप मेथीचा काढा घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि तापही लवकर कमी होण्यास मदत होते . जर इन्फेक्शन झालं असेल किंवा घशात सूज आली असेल तर मेथी घालून गरम केलेलं पाणी करून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो . मेथी मध्ये अँटी इन्फ्लामटेरी प्रॉपर्टी आहेत त्यामुळे शरीराच्या आत किंवा बाहेर कोठेही जर सूज आलेली असेल तर मेथी खाल्ल्याने आणि मेथीचा शेक घेतल्याने आराम मिळतो .
तर मग नियमित मेथीचा समावेश आपल्या आहारात करा आणि उत्तम आरोग्य मिळवा.