सुर्यदेवांना अर्घ्यदान का करावे..?? काय आहेत त्यामागची कारणं..??

पौष महिन्यात सूर्यदेवांची विशेष पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. शास्त्रांमध्ये जे पंचदेव सांगण्यात आले आहेत. या सर्वांची मनोभावे पूजा प्रत्येक कामाच्या सुरुवातीला केली जाते. हे पंचदेव म्हणजे भगवान शिव, श्रीविष्णू, श्रीगणेश, देवी दुर्गा आणि सूर्यदेव आहेत. सूर्यदेव प्रत्यक्ष आणि साक्षात डोळ्यांना समोर दिसणारे देवता आहेत. यामुळे यांची पूजाअर्चा केल्याने लवकर शुभफळं प्राप्त होतात.

सूर्यदेवांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे सकाळी तांब्याच्या कलशाने त्यांना स्मरुन अर्घ्यदान देणे. पुराणानुसार सूर्यदेवाला अर्घ्य देताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणंही आवश्यक आहे. या खास गोष्टी लक्षात ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा आपल्याला लवकरच प्राप्त होऊ शकते. सकाळी जर कधी ढगांमुळे सूर्याचे दर्शन होत नसेल तर सूर्योदयाच्या पूर्व दिशेकडे मुख करून अर्घ्य द्यावे. व सूर्य मंत्रांचा जप करावा. मंत्र : ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्याय नम:, ऊँ भास्कराय नम: इ.

ब्राह्मपर्वच्या सौरधर्ममध्ये सदाचरण अध्यायानुसार, जे लोक सूर्यदेवाला जल अर्पण करतात, त्यांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठायला हवं. घराबाहेर पडल्यानंतर सूर्य मंदिर दिसल्यास थांबून अवश्य नमस्कार करावा. सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी शास्त्रानुसार तांब्याच्या कलशाचाच वापर करावा. सूर्यदेवांना रविवारी गुळाचे दान करावे. जल अर्पण करताना सूर्याकडे थेट पाहू नये. जमिनीवर पडणाऱ्या पाण्यातून सूर्यदेवांकडे पाहत दर्शन घ्यावे.

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती ठीक नसेल त्यांनी रोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे सूर्यदोष दूर होऊ शकतात. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असल्यास किंवा अभ्यासात मन लागत नसल्यास सूर्यदेवांना गुरु मानून पूजा करावी. तांबे या धातूपासून सूर्य मूर्ती तयार करून घरात ठेवल्यास तुमच्या विविध अडचणीही दूर होऊ शकतात.

शास्त्रांमध्ये संध्या करताना सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचे महत्त्व थेट विशद केलेले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यदेवांसमोर तोंड करून सूर्यदेवांना जल समर्पित केले जाते. त्यालाच ‘अर्घ्य’ म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यदेवांना डोळ्यांची उपमा दिली गेली आहे. सूर्यदेवांकडे बघतांना सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंग हाच अपवाद रंग आहे की ज्यांतून सूर्यकिरणे परत येत नाहीत.

आपल्या शरीरात सुद्धा विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांची बुब्बळं काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणा-या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.

सूर्यप्रकाशाचा संबंध निव्वळ उष्णतेशी नाही. त्याचा संबंध मानवाच्या आहाराशी सुद्धा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की, सूर्यकिरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यदेवांना पाण्याचे अर्घ्य दिले जाते.

सूर्यदेव म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्यदेवांच्या सप्तरंगी किरणांमध्ये अद्भुत रोगनाशक शक्ती आहे. हे शास्त्रांमध्ये देखील नमूद केलेलं आहे.

सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्यकिरणांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतात. टीबीचे विषाणू उकळणा-या पाण्याने मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरित नष्ट होतात.

यावरूनच सूर्यकिरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत कुठल्याही शंका असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुद्ध हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रिय होते.

सूर्यकिरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते, त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.

‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुष’ (यजुर्वेद ७/४२) या मंत्राला सूर्यदेवांच्या स्थावर-जंगम पदार्थाचा आत्मा समजले जाते. जीवेत शरद: शतम् (यजुर्वेद ३६/२४) पासून शंभर र्वष जगण्याची, शंभर र्वष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थनासुद्धा सूर्यदेवांनाच केली जाते.

अमेरिकेतील एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, सूर्यदेवांपासून मिळणारी ऊब किंवा ऊर्जा आमच्या शरिरात सुरक्षित राहात असते. म्हणून आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही ऊब आपणास सूर्यदेवांकडून प्राप्त होते. सूर्यदेव आकाशात नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ उष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुद्धा आहे.

वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने आवश्यक आहे.

Leave a Comment