एकदा का विज्ञानाने हात टेकले की माणूस सरळ देवाच्या दारात उभा राहतो. तुम्ही नास्तिक असाल तर हे तुम्हाला लागू होत नाही.
पण, मुळात क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा डॉक्टरच बोलतात की ‘उन्हे दवा की नही दुआ की जरूरत है’.
भक्ती, देव, उपासना या सगळ्या ज्याच्या त्याच्या पद्धती नुसार होत असतात. शिर्डीच्या साई बाबांची तर आख्यायिका तर फारच प्रसिद्ध आहे.
बाबांच्या सतत पेटत असणाऱ्या धुनी मधून दिल्या जाणाऱ्या उदीने भल्याभल्या आजारांचे निदान झालेले कथा प्रसिद्ध आहेत.
आजही प्रसाद म्हणून शिर्डीत ती उदी पॅकेट मधून दिली जाते.
पुन्हा इथे सांगावस वाटतंयत, की हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. कोणाला या गोष्टी पटतात तर कोणाला खटकतात.
तर, उम्मीद पे दुनिया कायम है! हे परिस्थितीशी पराभूत झालेल्या कित्येक जणांना जिवंत ठेवण्याचे काम करते. हेच सध्या राजस्थानच्या नागोर जिल्ह्यामध्ये पॅरालिसिस झालेल्या रुग्णांसोबत पाहायला मिळत आहे.
राजस्थानात असं एक चमत्कारिक मंदिर आहे, जिथे लखवा (पॅरालिसिस) झालेला रुग्ण आठवड्या भरात तरतरीत होऊन जातो.
तर आज याच ‘लकव्या’ साठी प्रसिद्ध असलेल्या मंदिराबद्दल आपण बघणार आहोत. आज नाही म्हटलं तरी देशात पॅरालिसिसने ग्रस्त रुग्ण भरपूर आहेत.
एक भयानक रूप हा आजार देशात घेताना दिसत आहे. लाखो-करोडोच्या संख्येने याचे रुग्ण देशभरात बघायला मिळतील.
पॅरालिसिस वर वैद्यकीय उपचार हा परिणामकारक तसा कमीच दिसून येतो. मालिश सारख्या प्रकारामुळे रुग्ण थोडाफार उपचाराला प्रतिसाद देतो.
एकंदरीत वैद्यकीय उपचार हे थोड्याफार प्रमाणात कुचकामी इथे दिसून येते.
पण, राजस्थानात पॅरालिसिस झालेल्या व्यक्तींसाठी एक मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराला केवळ प्रदक्षिणा घातल्याने लकवाग्रस्त व्यक्ती बरी होऊन जाते.
राजस्थानात नागोरी पासून ४० किलोमीटर अंतरावर नागोर-अजमेर रस्त्याला लागून कुचेरा कसब्या जवळ बुटाती धाम आहे. हे धाम राजस्थानच्या देगाना या तालुक्यात येतं.
हा धाम पॅरालिसिसचा आजार बरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांची मान्यता आहे की, बुटाती धाम मध्ये असणाऱ्या संत चतुरदास मंदिराला केवळ सात प्रदक्षिणा मारल्या नंतर लखव्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो.
या बुटाती धाम मध्ये पूर्ण देशभरातुन लकवाग्रस्त रुग्ण येतात. मंदिराच्या सात प्रदक्षिणा करून हा आजार पुर्ण पणे नाहीसा होतो.
पण प्रदक्षिणा घालायला पण एक विशिष्ट पद्धत आहे. या मंदिरात दिवसाला दोन वेळा आरती होते, सकाळी आणि संध्याकाळी.
पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीने सकाळच्या आरती नंतर मंदिराच्या बाहेर प्रदक्षिणा मारायची तर संध्याकाळच्या आरती नंतर मंदिराच्या आत प्रदक्षिणा मारायची.
आत आणि बाहेर मिळून एक प्रदक्षिणा होते.
असे सात दिवस सात प्रदक्षिणा मारल्या नंतर पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीचा आजार आणि त्याचा प्रभाव हा कमी कमी होत जातो.
सात दिवसानंतर पॅरालिसिस झालेली व्यक्ती धडधाकट होऊन आपल्या पायावर उभे असलेले अनेक लोकं इथल्या स्थानिकांनी पाहिले असल्याचे सांगितले जाते.
भक्तांची मान्यता आहे की प्रदक्षिणा आणि होमकुंडातली उद लावल्या नंतर हा आजार कमी कमी होत जातो. शरीराचे जे भाग हलत नव्हते ते हळूहळू काम करायला सुरुवात होते.
कोण आहेत हे संत चतुरदास?
असे म्हणतात की ५०० वर्षापूर्वी बुटाती गावात संत चतुरदास यांचा निवास होता. बुटाती गावाच्याच चारण कुळात जन्मलेले चतुरदास आजीवन ब्रम्हचारी होते.
युवा अवस्थेतच त्यांच्याकडे असलेली शेकडो गुंठ्यांची जमीन दान देऊन ते हिमालयात गेले. गहन तपस्ये नंतर ते पुन्हा आपल्या स्वस्थानी परत आले.
बुटाती गावात परतल्या नंतर चतुरदास यांनी आपले तपस्या वगैरे कर्म नेमाने सुरू ठेवले, आणि सोबतच गोसेवा देखील करू लागले. तपस्ये मुळे त्यांना सिद्धी प्राप्त झालेली असे म्हटले जाते.
काही वेळेस सिद्ध योगी म्हणून देखील त्यांचा उल्लेख येथील लोक करतात.
याच सिद्धीच्या आधारे ते लकव्या सारख्या आजाराचे निदान करत. त्यामुळे आजही लोक लकवा घालवण्यासाठी त्यांच्या या मंदिराला प्रदक्षिणा घालतात.
संत चतुरदास यांच्या मंदिराची ख्याती एवढी पसरली आहे की, एका चबुतऱ्या पासून सुरू झालेल्या संत चतुरदास यांच्या आस्थेने आज तिथे मोठे मंदिर आणि त्या परिसराला धाम मध्ये रूपांतरित केले आहे.
या धाम बद्दल काही विशेष गोष्टी :
• रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची भोजन आणि निवासाची व्यवस्था मंदिर निशुल्क करते.
• सात दिवसापर्यंत थांबणे अनिवार्य असल्याने सातही दिवसांची सोय हे मंदिरच करते.
• सकाळी पाच आणि संध्याकाळी साडे सहा वाजता आरती होते. तेव्हा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना गाभाऱ्यात येणे अनिवार्य असते.
या मंदिरात चप्पल ऐवजी सर्व ठिकाणी व्हिलचेअर्स ची रांग दिसते.
एकादशीच्या दिवशी येथे सर्वात जास्त गर्दी असते. एकादशीच्या आरतीला या मंदिरात विशेष महत्त्व दिलं जातं.
प्रदक्षिणा पूर्ण झाली की रुग्णांना होम कुंडातील उदी दिली जाते. जी तिळाच्या तेलात मिसळून रुग्णांच्या असर झालेल्या अंगावर मालिश करण्यासाठी उपयोगी पडते.
असं म्हणतात.. ज्या ठिकाणी विज्ञानाचे प्रयत्न संपतात.. तेथून श्रद्धा आणि साधनेचा प्रवास सुरू होतो… या मंदिरात आल्यानंतर लकवा झालेली व्यक्ती केवळ प्रदक्षिणा मारल्याने बरी होते.