RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नुकताच ऑस्कर मिळाला.. परंतु हे फार कमी लोकांना माहिती आहे का दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची मुळं आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापुरात आहेत…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… सध्या भारताच्या चित्रपट सृष्टीत आणि एकंदरीतच दाक्षिणात्य चित्रपटांनी कहर केलाय. नाटू नाटू गाण्यामुळं आरआरआर ऑस्करच्या शर्यतीत आहे, ऑस्कर शो मध्येही रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर चर्चेत आहेत. थोडक्यात कधी बॉलिवूडच्या पिक्चरला एवढं डोक्यावर घेतलं नसेल, तेवढं लोकांनी टॉलिवूडला डोक्यावर घेतलंय.

विषय इथंच थांबत नाही, तर साऊथच्या सिनेमानं कमाईचे आकडेही हजार कोटीच्या आसपास गाठायला सुरुवात केलीये. त्यांची भव्यता, पिक्चरमधली फायटिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोरी या गोष्टींमुळं लोकं पुन्हा एकदा साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीचे फॅन झालेत.

थोडक्यात काय, तर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा सध्या वटवृक्ष झालाय.   पण हा वटवृक्ष जेव्हा छोटंसं रोपटं होता तेव्हा या रोपट्याला खतपाणी घालण्याचं काम आपल्या कोल्हापुरात झालं होतं.

कसं ? ते पाहूयात…..
खालील पैकी एक छायाचित्र आहे एच. एम. रेड्डी यांचं…

भारतातील पहिला बहुभाषिक (तमिळ आणि तेलगू) बोलपट ‘भक्त कालिदास’ हा चित्रपट एच. एम. रेड्डी यांनीच बनवला होता.

‘भक्त प्रल्हाद’ हा एच. एम. रेड्डी यांचा आणखी एक चित्रपट. हा दक्षिणेतील पूर्ण लांबीचा पहिला चित्रपट.

साऊथ चित्रपटातील महान अभिनेता अशी ओळख असलेले आणि नंतर तेलगू देसम पक्षाची स्थापना करून आंध्रचे मुख्यमंत्री झालेले NTR (सध्याच्या ज्यूनियर NTR चे आजोबा) हे सुद्धा त्यांच्या सुरवातीच्या काळात एच. एम रेड्डी यांच्या घरी चित्रपटात संधी मिळावी म्हणून रोज फेऱ्या मारत होते. अशा या एच. एम. रेड्डी यांना ‘मद्रास चित्रपट सृष्टीचे पितामह’ म्हणून ओळखले जायचे.

त्या काळातील आणखी एक दिग्गज निर्माता- दिग्दर्शक म्हणजे पी. पुल्लैया. ‘ पद्मश्री पिक्चर्स’ या त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी बरेच तमिळ आणि तेलगू चित्रपट बनवले होते.

NTR यांच्या प्रमाणेच तत्कालीन आणखी एक महान कलावंत म्हणजे ANR अर्थात अक्किनेनी नागेश्वर राव (सध्याचा लोकप्रिय अभिनेता नागार्जुन याचे वडील). पुलैया यांच्याच एका चित्रपटात ANR पहिल्यांदा पडद्यावर चमकले. त्या चित्रपटात बालकलाकार म्हणून ANR यांनी छोटी भूमिका केली होती. ‘जयभिरी’ हा पुलैया दिग्दर्शित आणि ANR अभिनित चित्रपट त्यावेळी तिकडे तुफानी गाजला होता.

आपल्याला आश्चर्य वाटेल पण वर उल्लेख केलेले एच. एम. रेड्डी आणि पुल्लैया हे दिग्गज कलावंत त्यांच्या सुरवातीच्या काळात कोल्हापुरातच राहायला होते.कुठं ? खरी कॉर्नर जवळील लक्ष्मी मंगल कार्यालयाच्या समोरच्या बोळात. जिथं आभाळा एवढ्या उंचीचा एक कलामहर्षी रहात होता.
‘कलामहर्षी बाबुराव पेंटर”

एक दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे कोल्हापुरात बाबुराव पेंटर यांच्या सानिध्यात राहून या दोघांनी चित्रपट निर्मिती मधील बारकावे शिकले आणि आपल्या प्रांतात जाऊन त्यांनी चित्रपट क्षेत्रात मोठं नाव कमावलं.

Kalamahrshi Baburao Painters Old House

पूलैया यांचा मघाशी उल्लेख केलेला ‘जयभिरी’ हा चित्रपट म्हणजे बाबुराव पेंटर आणि व्ही. शांताराम या गुरुशिष्य जोडीने दिग्दर्शित केलेल्या ‘शाहीर राम जोशी’ या मराठी चित्रपटाचा तेलगू रिमेक होता.सध्याचे बरेच हिंदी चित्रपट हे साऊथ चित्रपटांचे रिमेक असतात. अगदी त्याच्यावरुन राडाही होतो, पण त्याकाळी कोल्हापूरच्या या महान गुरुशिष्यांच्या जोडीचा चित्रपट दक्षिणेत रिमेक झाला होता.

बी. नागी रेड्डी हे तेलगू चित्रपटातील आणखी एक नामवंत निर्माता दिग्दर्शक.

त्यांनी चेन्नई मध्ये उभारलेला ‘ विजय वाहिनी स्टुडिओ ‘ हा तत्कालीन आशिया खंडातील सर्वात मोठा स्टुडिओ होता. हे नागी रेड्डी आणि त्यांचे सहकारी अलुर चक्रपाणी यांनी त्यांचे सुरवातीचे काही दाक्षिणात्य चित्रपट कोल्हापुरातच निर्माण केले.

ते सुद्धा बाबुराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली..
भारतात चित्रपट निर्मितीच्या प्रारंभाचं श्रेय जरी दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके यांचं असलं तरी चित्रपट निर्मितीचे मर्म जाणून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवून, नामवंत शिष्य निर्माण करून चित्रपट निर्मितीला गती देण्यात बाबुराव पेंटर यांचा नंबर सर्वात अव्वल ठरतो.

Kalamahrshi Baburao Painter

आणि निर्विवाद पणे म्हणावेसे वाटते भारतीय चित्रपटसृष्टीला सध्या जे गंगेच्या विराट पात्रासारखे रूप मिळाले आहे त्याची गंगोत्री त्यावेळचे कोल्हापूर होते आणि ही गंगा भारतीय लोकांपर्यंत पोचवणारा भगीरथ म्हणजे ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर.’

Leave a Comment